Share

भाजपच्या बावनकुळेंकडे पाच हजार कोटींचा काळा पैसा; जवळच्या नातेवाईकाचा गौप्यस्फोट

राजकारण म्हणलं की भ्रष्टाचार हा शब्द कानावर पडल्याशिवाय राहत नाही. राजकारणात अनेक विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. त्यातच आता भाजपच्या एका मंत्र्यावर भ्रष्टाचार करून कोट्यावधी संपत्ती हडपवल्याचा आरोप त्यांच्याच नातेवाईकाने केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजप नेते, माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधींची संपत्ती जमा केली असल्याचा आरोप त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने केला आहे. तसेच सर्व व्यवहाराचे आपण साक्षीदार असल्याचे देखील नातेवाइकाने सांगितले आहे. आरोप करणारा नातेवाइक दुसरा तिसरा कोणी नसून, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे.

सुरज तातोडे, असे त्या नातेवाईकाचे नाव आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी ॲड. सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेऊन सूरज तातोडे यांना तिथे उपस्थित केले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

सुरज तातोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नी या नात्याने माझ्या मावशी लागतात. त्यामुळे मी त्यांच्या घरी महिना पंचवीस हजार रुपये पगारावर कामास होतो. घरी पडेल ते काम करीत होतो. बावनकुळे मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे हिशेब ठेवण्याचे काम सोपविण्यात आले होते.

मात्र, 2018 साली एक कोटी रुपयांच्या हिशोबात 30 लाखांचा गोंधळ झाल्याने त्यांनी माझ्याकडून ही जबाबदारी काढून घेतली. त्यांनी मला कामावरून काढून टाकले. त्यामुळे माझे बीपी वाढले आणि अर्धांगवायू झाला. त्यानंतर त्यांच्या लोकांनी माझ्याकडील मालमत्ता बळकावणे सुरू केले. बावनकुळेंनी विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमविले, असा आरोप यावेळी सुरज तातोडे यांनी केला.

तसेच म्हणाले की, बावनकुळे यांनी माझ्या नावावर असलेले नागपुरातील 5 फ्लॅट, 4 कार आणि एका कंपनीतील शेअर्स जबरदस्तीने स्वतः च्या नावावर करून घेतले. सततच्या धमक्या आणी टेन्शन यामुळे मला ब्रेन हॅमरेज झाला. त्यातून मी बचावलो. मात्र या घटनेमुळे मी निराश झालो आणि खचून गेलो होतो. शेवटी ॲड. सतीश उके यांच्याकडे आल्याचे तातोडे यांनी सांगितले.

यावेळी, ॲड. सतीश उके आरोप केला की, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आजमितीस जवळपास 5 हजार कोटी रुपयांचे काळे धन आहे. सुरज तातोडे यांनी आमदार बावनकुळेवर थेट आरोप केले आहेत, त्यामुळे आमदार बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ॲड. उके यांनी केली आहे.

दरम्यान, ‘सूरज तातोडे हा आमचा नातेवाईक आहे. बेरोजगार असल्याने त्याला काम दिले. ब्रेन हॅमरेज झाले तेव्हा उपचार करून त्याचा जीव वाचवला. आता तो ॲड.सतीश उकेंच्या माध्यमातून तीन वर्षांपासून मला त्रास देत आहे. मी त्याच्याकडून कुठलीही मालमत्ता घेतलेली नाही. माझ्या परिवारात कुणी घेतली असेल तर त्याची रजिस्ट्री कार्यालयात जाऊनच झाली असेल. हा विनाकारण मला आणि परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे,’ असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडली आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now