महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा अमित शहांना दणका! वाचा नेमकं काय घडलंय

एकनाथ शिंदे यांनी बंड केले, आणि आपल्यासह आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शपथविधी होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा केली, आणि स्वतः मंत्रिमंडळात सामील न होता पाठिंबा दर्शवेल असे सांगितले.

मात्र, अचानक भारतीय जनता पक्षाकडून भाजप-सेना युतीच्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यामागे जे. पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मोठा हात आहे. मात्र, फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्याने, त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंद नाही हे चित्र दिसून आले आहे.

नागपूर शहरात अनेक ठिकाणी असे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

मात्र , होर्डिंग्जमधून गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब झाला आहे. हे होर्डिंग्ज नागपूर विमानतळ, छत्रपती चौक, खामला चौक, नागपूर शहरातील लक्ष्मीनगर चौकात रस्त्याच्या कडेला लावण्यात आले. त्यात अमित शहा यांचा फोटो दिसत नाही.

यावरून समजते की, होर्डिंगच्या माध्यमातून भाजप समर्थक अमित शहा यांच्यावर नाराज असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच या होर्डिंग्जमधून अमित शाह यांचा फोटो गायब आहे. माहितीनुसार,  हे होर्डिंग्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आणि निकटवर्तीय संदीप जोशी यांनी लावले आहेत.

अमित शहा यांच्या फोटोबाबत संदीप जोशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, फक्त मी दु:खी आहे, असं काही घडलं नाही, महाराष्ट्र दु:खी आहे, अडीच वर्षांपूर्वी जे  झाले आणि आज पुन्हा तेच झालं, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तसेच म्हणाले, प्रोटोकॉल प्रमाणे अमित शहा यांचा फोटो नसतो.

पंतप्रधान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर खासदार, सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष असा क्रम असतो त्यामुळे अमित शहा यांना फोटो आम्ही लावत नाही. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र , समर्थकांची अमित शहा यांच्यावर नाराजी आहे असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा नसताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास सांगितली. त्यामुळे यामागे अमित शहा यांची खेळी असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम अमित शहांनी केलं अशी चर्चा आहे.