शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेनेतील नेते देखील महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. त्यात नेते भास्कर जाधव यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.
भास्कर जाधव यांनी काल गुहागर येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या काळात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात दंगली घडवू शकते, असं खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केले.
भास्कर जाधव म्हणाले, सध्या संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बघितली तर लक्षात येईल की, ज्या-ज्या राज्यात भाजपाची सत्ता आली, त्या-त्या राज्यात निवडणुकांपूर्वी जातीय दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या गेल्या आहेत. हा भाजपचा इतिहास आहे, असे म्हणाले.
तसेच म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे सर्व मार्ग संपले आहेत. म्हणून आता महापालिका निवडणुकांपूर्वी शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जातीय दंगलीचा हा प्रयत्न पूर्वी अडीच वर्षांमध्ये झाला आहे.
आता भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. मुंबई महापालिका जिंकायची असेल, तर राज्यात जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही, हे त्यांना आता कळून चुकलं आहे, त्यामुळे आता जातीय दंगली होतील, असे भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. म्हणाले, राज्यातील मुस्लीम समाजासह सगळ्या जाती-धर्मातील लोकांना उद्धव ठाकरेंचं अतिशय सौम्य आणि सभ्य नेतृत्व भावलेलं आहे. नेही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भावलं आहे. हेच भाजपचं दु:ख आहे.
भाजपने शिवसेना पक्ष फोडला पण फक्त चाळीस आमदार फोडू शकले. पण चाळीस आमदारांच्या बदल्यात आज प्रत्येक ठिकाणी चार लाख लोकं शिवसेनेच्या मागे उभी आहेत. हे चित्र आज महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे आता भाजप राज्यात दंगलीचा काहीतरी उदयोग करू शकते, असे भास्कर जाधव म्हणाले.