राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सभा आणि मेळाव्यामधून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईतील शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. एवढेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीकास्त्र सोडलं. यावेळी ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतो आहे. त्यांच्याकडे काही मशीन वगैरे आहे का? कारण भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांनाच सोबत घेतलं आहे. राज्यात समस्या आहेत आणि मुख्यमंत्री फिरत आहेत. आज दिल्ली त्या आधी सुरत, गुवाहाटी, गोवा हे सगळं फिरतं सरकार आहे. कसा कारभार चाललाय कुणालाच माहित नाही.
तसेच म्हणाले, शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत. ज्यांना कुणाला अंगावर यायचं आहे या, तुम्हाला मी आस्मान काय असतं ते दाखवतो. शिवसेना संपवण्यासाठी आता आपल्यातल्या गद्दारांना सोबत घेतलं आहे. मुन्नाभाईला सोबत घेतलं आहे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
याआधी देखील १४ मेच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना मुन्नाभाई म्हणून संबोधले होते. आता कालच्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंचा मुन्नाभाई म्हणून उल्लेख केला. त्यांनी काल भाषण करताना राज ठाकरेंनाही इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेला ढेकूण किंवा झुरळ नाही कुणीही आलं आणि चिरडून गेलं.’ तसेच म्हणाले, शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करू नका. जर संघर्ष झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यात होईल.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल आणि कमळाबाईचे कपडे साफ राहतील मला तो त्यांचा डाव साधायचा नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना इशारा दिला. राज ठाकरे आता यावर काय भूमिका घेतात हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेलच.