महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे पक्षातील अनेक आमदार फुटले, आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर आता आणखी कोणत्या पक्षातील नेते फुटणार आणि एकनाथ शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा आहे.
असे असतानाच काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे समोर आले आहे.
खासदार प्रतापराव चिखलीकर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी बहुमत चाचणीला गैरहजर राहून एक प्रकारे भाजपला मदतच केली आहे. शिवाय बहुमत चाचणीला अशोक चव्हाण यांनी चार आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे त्यांचे आभार मानने माझे काम आहे.
तसेच म्हणाले, त्यांचे पक्षात येणे किंवा घेणे हे पक्षश्रेष्ठींच्या हातामध्ये आहे. अशोक चव्हाण हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे स्वागत करीन असेही प्रतापराव चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी ते अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. तसेच म्हणाले, त्यांचा मतदारसंघ खड्ड्यांनी भरलेला असल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार आणि पीडब्ल्यूडी विभागाने मतदारसंघातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी काहीही केले नाही.
नांदेडमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि माझ्या भागातील सत्य समोर आणणे ही माझी जबाबदारी आहे. खासदार म्हणून मी माझ्या क्षमतेनुसार काम केले आहे, परंतु नांदेडमधील खड्डे बुजवण्याचे काम राज्यसरकारचे आहे. हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते आहेत, असे चिखलीकर म्हणाले.