माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. त्यांची आज म्हणजेच गुरुवारी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांना मोठ्या रकमेची ऑफर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असा कमलनाथ यांनी आरोप केला आहे.
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एका आमदाराने एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या मोबदल्यात फोनवरून मोठ्या रक्कमेचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती दिली होती. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी माहिती देणारे आमदार माजी मंत्री आणि प्रमुख आदिवासी नेते आहेत.
हा नेता म्हणाला की, भाजपचे लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आदिवासी लोकांना अमिष दाखवायचे किंवा धमकावायचे, आता त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील सोडली नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आणि दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्या आमदार, खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा आरोप केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे आव्हान आहे.
दरम्यान, द्रौपदी मूर्मु या मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्या मुंबईत काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेने या निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. सध्या तरी मुर्मू यांचं पारड जड दिसतंय. तर यशवंत सिन्हा यांच्यासाठीही विरोधकांकडून जोर लावण्यात येत आहे. मात्र देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण असणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.






