रवी राणांचा खारमधील फ्लॅट सध्या अडचणीत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणांच्या मुंबईतल्या घरावर मुंबई महानगरपालिका कारवाई करण्याच्या बेतात आहे. त्यांना तशी मुंबई महानगरपालिकेने नोटीस दिली आहे. यामुळे आता अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याचं घर देखील अडचणीत आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून सध्यातरी त्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.
या प्रकरणी आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तसेच जामिन अर्जावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे राणा दाम्पत्याला १४ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. अशातच रवी राणांच्या खारमधील फ्लॅटवर मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, याबाबत मुंबई महापालिकेकडून काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. याचबरोबर त्या फ्लॅटचं 4 मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस सध्या पाठवण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी यापूर्वी भाजप नेते नारायण राणे आणि अभिनेत्री कंगना राणावर यांच्यावरही मुंबई महापालिकेकडून अशीच कारवाई करण्यात आली होती.