महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. लवकरच सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचीही शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे गटातील आमदार यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत.
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात रोज काहींना काही वाद – प्रतिवाद सुरू आहेत. याचा फायदा घेत भाजपचे काही नेते देखील आता बंडखोर आमदारांना ढाल बनवत उद्धव ठाकरेंवर टीका करू लागले आहेत. यावर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद यांचं ट्विट बघता त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे, हे देखील पाहायला मिळत आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील, असे त्यांनी प्रथम ठळक शब्दांत लिहिले आहे.
त्यानंतर त्यांनी लिहिले की, पण जर शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे दोन अन्य वाचाळवीर आदरणीय उद्धवसाहेब आणि शिवसेनेवर टीका करतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका.
आदरणी शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमची शत्रू नाही. परंतु वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही, पण भाजपने याची दखल घेणे गरजेचे आहे. असे दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
https://twitter.com/deepalisayed/status/1544591002765492225?t=RKBY3IEtRm8XDPdPcqPSSg&s=19
दरम्यान, त्यांनी एक ट्विट केलं होतं त्यात लिहिले होते की, ‘काहीजण म्हणतात आदरणीय उद्धव साहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. यासर्व घटनेत शिवसैनिक हरला त्याला कळत नाही की हि भुमिका शिवसेनेची कि ती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवुन शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र’ असे त्यांनी ट्विट केले होते.