Share

शिवाजी पार्कवर लतादिदींचे स्मारक उभारण्याची भाजपची मागणी; ‘या’ पक्षांनी केला विरोध

महागायिक, भारतरत्न लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काल शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता शिवाजी पार्क येथेच त्यांचे स्मारक तयार करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली. त्यावर आता विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपले मत मांडले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये तयार करण्यात यावे अशी मागणी केली. यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी नकार दर्शवत आपली मतं मांडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवाजी पार्क मध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यास नकार दिला आहे.

पत्रकारांनी शिवाजी पार्क मध्ये स्मारक उभारण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘याला माझा साफ विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवं. त्याची स्मशानभूमी होऊ नाही. शेजारीच मोठी आणि चांगली स्मशानभूमी आहे.’

तसेच म्हणाले, ‘शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. या मैदानावर मुलं खेळतात. एखाद्या व्यक्तीचे स्मारक उभारायचे असेल तर त्यासाठी दुसऱ्या अनेक जागा आहेत. परंतु, मुलांच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करू नाही असं मला वाटतं.’ असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली की, या प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर विचार करण्याची गरज आहे. लताजी या राजकारणी नाहीत. त्या आपला अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणं इतकी सोपी बाब नाही. असे संजय राऊत म्हणाले होते.

तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवाजी पार्क मध्ये लतादीदी यांचे स्मारक व्हावे असं सांगितलं. ते म्हणाले, ‘लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हायला हवं. देशविदेशातील लोकांना लतादीदींच्या गोड आवाजाचं स्मरण होईल, अशा दर्जाचं हे स्मारक असावं,’ असं पटोले म्हणाले.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मात्र,कडाडून विरोध केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.” असे ट्विट करत त्यांनी शिवाजी पार्कवरील लतादीदींच्या स्मृतीस्थळाच्या मागणीला मनसेच्या वतीने विरोध दर्शवला आहे.

भाजपकडून लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवावं. ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी पत्रात म्हटलं आहे.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now