Share

गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार

देशात आता पाच राज्यांच्या निवडणुका आज संपल्या असून त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी निकालासंदर्भातले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात राजकीय दृष्ट्या सर्वात प्रभावशाली असलेलं राज्य उत्तर प्रदेश, देवभूमी उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये निवडणूक पार पडली आहे.

या सर्व राज्यांतील निवडणुकांचा निकाल हा 10 मार्चला लागणार असल्याने कुठे कोण जिंकणार याबाबत राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच आता गोव्याचे एक्झिट पोल समोर आल्यामुळे त्याचीही राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत एकूण 40 जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे. झी न्यूज हिंदीने जाहिर केलेल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपच्या जागा कमी होत आहे. त्यात भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर यावेळी गोव्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागा मिळू शकतात, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. गोव्यातील प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पक्षाला पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागेल. असं सर्वेतून समोर आलं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने रस दाखवल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. त्याचबरोबर गोव्यात सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता.

दरम्यान आता या विविध प्रसारमाध्यमांनी जाहिर केलेल्या सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस वरचढ ठरण्याची शक्यता या सर्वेतून दिसत आहे. आम आदमी पक्षानं पंजाब राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. त्यातच आता झी न्यूजसह विविध सर्वेंमधून तिथं आम आदमी पक्षाला बहुमत मिळताना दिसत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now