जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भारतातील रोजगाराबाबत आपले मत व्यक्त करत, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच इतर देशाच्या तुलनेत भारत मागे असल्याचं म्हटलं आहे.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, भारतातील भाजप सरकार लोकांना रोजगार देऊ शकत नाही हे दुर्दैवी असून, महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे आपल्या देशाची मालमत्ता विकली जात असून, भाजपकडे लोकांना देण्यासारखे काहीच नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
यावेळी त्यांनी भारताची तुलना पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ देशाबरोबर केली. म्हणाल्या, गरिबीच्या बाबतीत भारत देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्या मागे आहे. महागाई, बेरोजगारी या घटकांपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकार सामान्य नागरिकांना मुस्लिमांच्या मागे पाठवत आहे.
त्यामुळेच भाजपने मशिदी, ताजमहाल यांसारखे मुद्दे समोर आणले आहेत, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच म्हणाल्या, देशाची लूट करून पळून गेलेल्या लोकांचे पैसे परत मिळवण्याऐवजी ते मुघल काळात बांधलेल्या मालमत्तांचे नुकसान करण्यात पुढे आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचार आणि त्यानंतर अल्पसंख्याकांवर बुलडोझर चालवण्याची घटना यावरही प्रतिक्रिया दिली. म्हणाल्या, ज्याप्रकारे अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, त्यांच्या घरांवर बुलडोझर टाकला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याअशा घटनांची स्वत:हून दखल घेण्यासाठी न्यायव्यवस्था पुढे येत नाही.
देशातील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पत्रकारांवर देशद्रोहाचे आरोप होत राहिल्यास आपली स्थिती श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. मला आशा आहे की भाजप श्रीलंकेतील परिस्थितीपासून धडा घेईल आणि भारतात वाढणारा जातीय तणाव टाळेल, असेही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.