Share

भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा; कोण आहेत द्रौपदी मुर्मू? जाणून घ्या..

येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी १८जुलैला मतदान होणार आहे. २१ जुलैला देशाला नवीन राष्ट्रपती मिळतील. भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांचं नाव घोषित करण्यात आलं तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी महिला आदिवासी व्यक्तीला संधी मिळावी यावर भर दिला.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, देश पहिल्यांदाच आदिवासी समाजातून राष्ट्रपती देण्याची तयारी करत आहे. यावेळी पूर्व भारतातील कोणाला तरी संधी देण्याचा सर्वांमध्ये सहमती झाली होती. आजवर देशाला आदिवासी महिला राष्ट्रपती मिळालेल्या नाहीत.

या गोष्टीचा विचार केला. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने बैठकीत द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.भाजपने राष्ट्रपती पदासाठी नाव घोषित केलेल्या या द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, द्रौपदी मुर्मूने आपल्या आयुष्यात बराच काळ शिक्षिका म्हणून काम केले.

सर्वपल्ली राधाकृष्णन ज्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात सतत सक्रिय होते त्याच प्रकारे द्रौपदी मुर्मू यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या देशातील पहिली आदिवासी राज्यपाल होत्या. २०१५ ते २०२१पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू या भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. याशिवाय द्रौपदी मुर्मू यांनी आमदार म्हणून अप्रतिम काम केले आहे. २००७ मध्ये त्यांना नीळकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा ओडिशा विधानसभेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.

द्रौपदी मुर्म यांनी नेहमीच आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत. हा पैलू लक्षात घेऊन एनडीएनेही त्यांचे नाव पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचे स्वागत केले आहे. मोदींनी याबाबत ट्विट करत आपले मत मांडले आहे .

मोदींनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, द्रौपदी मुर्मूजींनी आपले जीवन गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांना अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. मला खात्री आहे की, त्या एक महान राष्ट्रपती म्हणून सिद्ध होतील. त्यांच्या नावाची घोषणा करून पक्षाने एकीकडे आदिवासी समाजाला जोपासण्याचे काम केले आहे तर दुसरीकडे महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now