Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जंगी माहोल सुरू असतानाच राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) यांनी एकत्र येऊन थेट युतीची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या नव्या घडामोडीमुळे महायुतीतील तिसरा घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group) मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक निवडणुकीत नवे राजकीय समीकरण
राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. जागावाटप आणि उमेदवारी ठरवण्याची चुरस सुरु असतानाच ही पहिली महत्त्वाची युती जाहीर झाली आहे. भाजपने ४१ जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ८ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे नव्याने लिहिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुळगाव-बदलापूरमध्ये शिवसेनेला डावलत युती
या नव्या युतीचं केंद्र बनलं आहे कुळगाव-बदलापूर (Kulgaon-Badlapur) नगरपालिका. येथे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने थेट स्थानिक पातळीवर एकत्र येत युती केली आहे. या युतीतील जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्षपद भाजपच्या वाट्याला गेलं आहे. राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपदासह आठ जागा आणि एक स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आलं आहे.
शिंदे गटात वाढली नाराजी
या युतीमुळे महायुतीतील तिसरा घटक, म्हणजेच शिवसेना शिंदे गट, पूर्णपणे समीकरणाबाहेर गेला आहे. राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजप यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी भाजपचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले (Ashish Damle) यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेकडे राज्यातील पहिली महायुतीतील ‘आतील युती’ म्हणून पाहिले जात आहे. भाजपने शिवसेनेलाही या स्थानिक युतीत सामील होण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र स्थानिक स्तरावर मतभेद न मिटल्याने ती शक्यता शेवटी बाद झाली.
या घटनाक्रमामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महायुतीतील एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवसेनेची नाराजी वाढत असताना, भाजप आणि राष्ट्रवादी पवार गट या दोघांनी मिळून आगामी निवडणुकीत मजबूत आघाडी घेण्याचा निर्धार दाखवला आहे.






