‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) यंदाचा सीझन खूपच चर्चेत राहिला. या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता सीझन संपला असला तरी यातील स्पर्धकांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. अभिनेता विकास पाटील या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता. ‘बिग बॉस’ शोनंतर विकास पाटील कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. पण आता तो एका गोष्टीमुळे माध्यमात चर्चेत आला आहे.
विकास पाटील हा मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूर जिल्ह्यातील गलगले गावात त्याने आलिशान घर बांधलं आहे तेही शेतात. आपल्या गावी आपलं एक टुमदार घर असावं, अशी विकासची इच्छा होती. आणि त्याची ही इच्छा आता पूर्ण झाल्याने तो खूपच खूश आहे. त्याच्या या नवीन घराचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत विकासने लिहिले की, ‘कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला, परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजेनिमित्ताने माझं कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं, छान वेळ देता आलं. गाव आणि गावाकडच्या गोष्टींची बातच निराळी!’
या पोस्टशिवाय विकासने एक लाईव्ह व्हिडिओसुद्धा शेअर केला. या व्हिडिओत विकास त्याच्या गावाबद्दल आणि त्याच्या घराबद्दल खूप काही बोलला आहे. तसेच व्हिडिओत त्याने त्याच्या आई-वडिलांचाही परिचय करून दिला. तसेच त्याने या व्हिडिओत त्याचे संपूर्ण घर आणि शेतसुद्धा दाखवले. विकासच्या या नव्या घराबद्दल त्याच्या चाहत्यांनी कमेंटद्वारे त्याचे अभिनंदन केले.
‘बिग बॉस’ शोदरम्यान विकास पाटील आणि विशाल निकमची मैत्री खूपच गाजली होती. शोदरम्यान दोघांची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेली. त्यांच्या या मैत्रीला प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले होते. शो संपल्यानंतर विशाल आणि विकास दोघेही ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या तिसरा सीझनचा विजेता सांगलीचा रांगडी गडी विशाल निकम ठरला. प्रेक्षकांनी भरघोस मते देऊन विशाल निकमला विजयी केले. तर जय दुधाणे हा शोचा उपविजेता ठरला. या शोमध्ये विकास पाटील टॉप ३ पर्यंत पोहोचला होता. मात्र, शेवटी तिसरे स्थान मिळवत तो शोमधून बाहेर पडला.
महत्त्वाच्या बातम्या :
बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील सैफ अली खानचा फर्स्ट लुक आला समोर, ह्रतिक रोशन म्हणाला..
‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध ३ वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, अद्याप कुणालाही बोलावले नाही’
मराठी चित्रपटाचा साऊथमध्ये डंका! बाहुबली प्रभासने केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक, म्हणाला..