शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अंजनगांव सुर्जी येथे शिवसैनिकांनी रविवारी हल्ला केला होता. शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घोषणा देखील दिल्या होत्या. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती.
आता या घटनेबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी आता१० शिवसैनिक पोलिसांना शरण गेल्याची माहिती मिळत आहे. रविवारी घडलेल्या या राड्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुर्जी येथे पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली होती.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यासमोर घोषणा देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. यावर अंजनगाव पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी १५ ते २० शिवसैनिकांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले असून ११ जणांना ताब्यात घेतलं होतं.
मात्र हे खरे हल्ले करणारे नाहीत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुखांनी दिली होती. याप्रकरणी आता १० शिवसैनिकांनी आत्मसमर्पण केलं असून यात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिवटे आणि शिवसेना शहरप्रमुख राजू अकोटकर यांचा समावेश आहे.
या प्रकरणावर तालुकाप्रमुख महेंद्र दिवटे म्हणाले, आमदार संतोष बांगर यांनी जे चॅलेंज दिलं ते मी स्वीकारलं आहे, आता त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच दिवटे यांनी यावेळी बांगर यांना आव्हान केलं, म्हणाले,’ मी संतोष बांगर यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना हरवू शकतो.’
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार संतोष बांगर दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. ५० खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा देत शिवसैनिक संतोष बांगर यांचा गाडीसमोर आडवे झाले होते. गाडीच्या कांचावर हाताने मारले होते. यावेळी बांगर कुटुंबियांसोबत होते. हल्ल्यानंतर बांगर यांनी शिवसैनिकांना चॅलेंज दिलं होतं की,’ कधी कोणत्या दिवशी यायचे मी चौकात उभा आहे’.