एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. बहुसंख्य आमदार, खासदार शिंदे गटात आले आहेत येत आहेत. त्यातच आता शिवसेनेला कोकणातून मोठा धक्का मिळाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे अखेर शिवबंधन तोडून शिंदे गटात गेले आहेत.
सदानंद चव्हाण यांनी आज आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी, उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. त्यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके उपतालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे अनंत पवार युवक चे माजी तालुकाप्रमुख संदेश आयरे विभाग प्रमुख बळीराम चव्हाण, अनारीचे सदाभाऊ पवार आदी निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघावरील त्यांची पक्कड ढिली झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे ते शांत होते. संघटनेच्या बैठकांसाठी आणि कार्यक्रमासाठी ही त्यांना डावलले जात असल्यामुळे ते नाराज होते.
जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन भाजपबरोबर हात मिळवनी केली. राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर चिपळूणमध्ये शिवसैनिकांनी तातडीची बैठक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी चव्हाण संघटनेबरोबर होते.
मात्र, नंतरच्या काळात चक्र फिरली आणि चव्हाण यांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष संघटनेवरील आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्याचवेळी चव्हाण हे पक्षावर आणि नेतृत्वावर नाराज असून ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
सदानंद चव्हाण यांनी शिवसेना सोडली यावर शिवसेनेचे सचिन कदम म्हणाले, सदानंद चव्हाण दहा वर्षे आमदार होते. पक्षाने त्यांच्या वर अन्याय केला असे काही घडले नाही. महाराष्ट्रमध्ये माजी आमदार भरपूर आहेत. सदानंद चव्हाण शिंदे गटात का गेले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.