गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणाचा तपास विशेष तपासणी पथक करत आहे. परंतु या प्रकरणी आता एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई क्रुझ पार्टी प्रकरणात मुख्य नाव असलेल्या आर्यन खानकडे कधी ड्रक्स आढळलेच नव्हते. असे या खुलाश्यांतुन समोर आले आहे.
यामुळे या प्रकरणाची कारवाई करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कारवाई करत असलेल्या पथकाकडून सांगण्यात आले आहे की, आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळलेच नव्हते. त्याचबरोबर तो कोणत्याही ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग नव्हता.
त्यामुळे त्याचा फोन घेवून सर्व चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. जरी त्याचे चॅट्स तपासले गेले तरी यातून हे सिध्द होत नाही की, तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग आहे. तसेच तपासून समोर आले आहे की, आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला कधीही संबंधित क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हते.
यासर्व समोर आलेल्या माहितीमुळे समिर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाने म्हटले आहे की, एनसीबीच्या मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत.
याअगोदरच नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे समिर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता परत विशेष तपास पथकाने केलेल्या खुलाश्यांमुळे समिर वानखेडेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गेल्या ३ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने ड्रक्स पार्टीवर छापेमारी केली होती. यावेळी समिर वानखेडें यांनी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती.
या प्रकरणात तब्बल २८ दिवस कोठडीत राहिल्यानंतर आर्यन खानला जमानत देण्यात आली होती. परंतु या काळात एनसीबीच्या तपासावर अनेकांनी बोट उचलले होते. त्यानंतर आता या प्रकरणात सर्वांनाच हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीचा अद्याप तपास सुरु आहे. परंतु या माहितीमुळे एका नवीन चर्चेला उधाण आले आहे.