काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रभागरचना जाहिर होण्याच्या दोन दिवसांतच आता महापालिकेत तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. कारण भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार तथा नेते किरीट सोमय्या हे महापालिकेत पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असता त्या ठिकाणी शिवसैनिकांनी गर्दी करत राडा घातला. सोमय्या हे महापालिका इमारतीबाहेर पडत असताना त्यांना काही शिवसैनिकांनी थेट धक्काबुक्की केल्यामुळं वातावरण तापलं आहे.
पुणे महापालिकेत संजय राऊत यांची भागिदारी असलेल्या व आस्तित्त्वात नसलेल्या लाइफलाईन हॉस्पीटल मँनेजमेंट सर्विस कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट देऊन त्यात 100 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ते या भ्रष्टाचाराची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत द्यायला निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना धक्काबुक्की केली आहे. यावेळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांना सुरक्षेची साखळी तयार करत गाडीत बसवून त्या ठिकाणाहून दुसरीकडे रवाना केलं आहे.
सोमय्या हे महापालिकेत असताना त्यांना शिवसैनिकांनी घेरले असता त्यावेळी त्यांना सुरक्षारक्षक बाहेर काढत असताना ते पायऱ्यांवर पडले. परंतु या घटनेवेळी मला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन शिवसेनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाद निवळला.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका काही दिवसांवर आलेल्या असताना आता भाजपच्या मोठ्या नेत्याला धक्काबुक्की करण्यात आल्यामुळं आता याचा आगामी राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु या घटनेवेळी पुण्यातील एकही मोठा भाजपचा राजकीय नेता उपस्थित नसल्यामुळं आश्चर्यदेखील व्यक्त केलं जात आहे.
https://twitter.com/Krunal_Goda/status/1489937362805489666?t=4uqmHf_-ecDTRcc940Axnw&s=19
मुंबईचे माजी खासदार असलेले किरीट सोमय्या हे भाजपचे फायरब्रांड नेते म्हणून ओळखले जातात. ते पेशानं चार्टर्ट अकांउन्टट आहेत. त्यामुळं त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर विविध घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर तोडपाणी करत असल्याचाही आरोप केला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांची सत्ता असलेल्या माळेगांना साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा होत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्यासंबंधीतली माहिती त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये दिली होती.