ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज संपले. तीन दिवस याचं काम सुरू होतं. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणी दरम्यान शिवलिंग सापडले आहे. आता त्यावर ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचं समजत आहे.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याबाबत मात्र अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. सध्या विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वेक्षण करणाऱ्या समितीने नंदी समोरील विहिरीचा सर्व्हे केला. विहिरीत कॅमेरा टाकून व्हिडिओ सर्वेक्षण केलं होतं. त्याचबरोबर याआधी रविवारी झालेल्या सर्वेक्षणात पक्षमी दीवार, नमाज स्थळ, वजू स्थळ तसंच, तळघरातील सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
दरम्यान, ज्ञानवापी मशिद परिसरात स्वस्तिक आणि ओमचे निशाण मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंतीवर सापडलेल्या या चिन्हांवर रंगकाम करुन लपवण्यात आलं आहे. तसेच एक गुप्त तळघरही सापडलं आहे, मात्र ते कचऱ्याने लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
शंकराचे प्राचीन मंदिर तोडून तिथे मशिद बांधली असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद अधिक पेटला आहे. मागील वर्षी पाच महिलांनी मशिद परिसरात श्रृंगार गौरी मंदिरात पुजेची परवानगी व मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती.
वारणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने 12 मे रोजी मोठा निर्णय दिला होता. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना हटवण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाने विशाल कुमार सिंग यांचीही न्यायालयाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. न्यायालयाने सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून 17 मी पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.






