काल विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. त्यानंतर सगळ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या ट्विट हँडल वरून श्रद्धांजली वाहिली. मात्र, यावेळी निधनाबाबत दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांकडून मोठी चूक झाली.
मनोहर म्हैसाळकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद भूषविले असून ५० वर्षांपासून ते या साहित्य संघाचे सदस्य होते. मात्र, काल सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत दुखः व्यक्त केले आहे. मात्र, यादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून चुकीचा फोटो पोस्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुख्यमंत्र्यांनी चुकीचा फोटो टाकल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सध्या त्यांनी पोस्ट केलेला चुकीचा फोटो डिलीट करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे की, ‘विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक मनोहर म्हैसाळकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, ही प्रार्थना’.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष,अभ्यासू वक्ता,भाषा अभ्यासक मनोहर म्हैसाळकर यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो,हि प्रार्थना!
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2022
मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट शेअर करताना ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. दरम्यान, मनोहर म्हैसाळकर यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. त्यांना गुरुवारी १३तारखेला नागपुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.

या रूग्णालयात त्यांनी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अंतिम श्वास घेतला. आज त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मनोहर म्हैसाळकर २००६ सालापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा एक हाती सांभाळत होते.