सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फार्महाउसवरील शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पाटण तालुक्यातील रोमनवाडी ( येराड ) या गावात सोमवारी सायंकाळी ५ वाजता झाली आहे. सौरभ अनिल पवार (वय १६) आणि पायल अनिल पवार (वय १४ रा. काठी, ता. पाटण) अशी मृत्यू झालेल्या बहीण भावांची नावे आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमनवाडी येथील एका फार्महाऊसवर सचिन जाधव नावाचे व्यक्ती कामाला आहेत. त्यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. अनिल पवार आणि त्यांची पत्नी फार्महाऊसकडे गेले असता, त्यांची दोन्ही मुले शेततळ्याकडे पळत गेली. मुलगा सौरभ शेततळ्याजवळ गेला. शेततळ्याजवळ त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो पाण्यात पडला.
सौरभला पाण्यात बुडत असताना पाहून त्याची बहीण पायलने देखील त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण ती देखील बुडू लागली. दोन्ही मुले शेततळ्यात बुडाल्याची माहिती मिळताच सचिन जाधव आणि मुलांच्या आई-वडिलांनी शेततळ्याकडे धाव घेतली. पण सौरभ आणि पायल दोघेही पाण्यात बुडालेले होते. त्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शिरळ येथील मच्छिमारांना बोलवण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता मच्छिमारांना दोन्ही मृतदेह हाती लागले. मुलांचे मृतदेह पाहताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी भेट देऊन पाटणचे पीएसआय महेश पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
यावेळी रोमनवाडी ( येराड ) गावचे सरपंच प्रकाश साळुंखे आणि तलाठी पी.जी. शिंदे उपस्थित होते. काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार काही वर्षांपासून कामानिमित्त पत्नी व मुलांसमवेत विजयनगर (ता. कराड) येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सौरभ हा रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील आयटीआय महाविद्यालयात शिकत होता. मुलगी पायल ही विजयनगर येथील हायस्कूमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती.
भावा-बहिणींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पवार कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. गेल्या आठवड्यात नांदेडमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. शेततळ्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला होता. दत्ता हा मासे पकडण्यासाठी शेततळ्यात उतरला असता तो बुडत होता. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी संजयने पाण्यात उडी घेतली. या घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या :-
‘आबा तुमची खूप आठवन येतेय’; विजयानंतर रोहीत पाटील आबांच्या आठवनीने गहीवरले
नगरपंचायतीत 12 जागांवर विजय मिळवत रोहित पवारांनी मिळवली एक हाती सत्ता….
‘छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभं राहणे याला दांभिकपणा म्हणतात’






