Share

आता सिनेमागृहातही वाजणार ‘भोंगा’; मनसेने मोठी घोषणा करत तारीखही सांगीतली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवर असलेल्या भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर , मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘भोंगा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.

संदीप देशपांडे यांनी सांगितले की, ‘भोंगा’ हा विषय राज ठाकरे सातत्याने मांडत आहेत. यामुळे देशभर वातावरण ढवळून निघाले. हा सामाजिक मुद्दा आहे, धार्मिक नाही यावर भाष्य केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती मनसे चित्रपट सेनेचेअध्यक्ष अमेय खोपकर, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अमोल कागणे यांनी केली आहे.

तसेच देशपांडे म्हणाले, राज ठाकरे यांच्या परवानगीनेच हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. 3 मे रोजी मनसेच्यावतीने राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, 3 मे रोजी अक्षय तृतीया आहे. कोणतंही शुभ काम या दिवशी करतात. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हाच मुहूर्त निवडल्याचं त्यांनी सांगितले.

‘भोंगा’ चित्रपटाबद्दल अधिक माहिती म्हणजे, 2018 मध्येच हा सिनेमा पूर्ण झाला. परंतु, कोरोनामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. 2019 मध्ये या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून, आणखी जवळपास 10 अवाँर्ड मिळाले आहेत. तसेच, राज्य सरकारचेही पुरस्कार याला मिळालेत.

राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर, दुसरीकडे 3 मे रोजीच भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणाही मनसेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या माध्यमातून मनसेचा भोंगा पुन्हा जोरात वाजणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी 1 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तत्पूर्वी 3 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात त्यांनी इशाराही दिला आहे. त्यावरून सध्या राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now