Share

भन्नाट ऑफर! पावनखिंड पाहणाऱ्यांना मिळणार मिसळवर डिस्काऊंट, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला..

गेल्या काही आठवड्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटाने लोकप्रियता मिळवत पैसा देखील बक्कळ कमावला. त्यातच आता ‘पावनखिंड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. अशावेळी, या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी एक पोस्ट टाकली, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना नियमांचे पालन करून 50 टक्क्यांच्या उपस्थितीत देखील या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने मराठी चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, असे म्हणता येईल.

ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला मिळत असणारी प्रसिद्धी पाहून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘पुष्पा’ चित्रपटाची तुलना ‘पावनखिंड’ सोबत करत मराठी लोकांना एक आवाहन केलं आहे.

इन्स्टा स्टोरीमध्ये त्यांनी ही पोस्ट केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, जोपर्यंत पावनखिंड चित्रपट हा थिएटरमध्ये सुरू असेल तोपर्यंत ग्राहकांना मिसळीवर डिस्काऊंट मिळेल. पावनखिंड हा चित्रपट पाहिल्याचे तिकिट घेऊन या आणि मिसळवर 20 टक्के डिस्काऊंट मिळवा, अशी ही ऑफर देण्यात आली आहे. ‘पुष्पा’ पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणे हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, असे त्यांनी लिहिले आहे.

या पोस्टमधील ‘पुष्पा’ पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’ वर करणे हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, या ओळीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवरती अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. माहितीनुसार, या चित्रपटाने वीकेंडला जवळपास सहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने याचे मल्टिप्लेक्समधीलही शो वाढवण्यात आले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आठवड्याभरातच एवढी कमाई केलेला ‘हा’ चित्रपट अजून किती गल्ला कमावतो हे पाहणे आवश्यक राहील. त्यातच चिन्मय मांडलेकर यांनी नुकत्याच केलेल्या पोस्टचा मराठी माणसांवर प्रभाव पडून शो हाऊसफुल होणार का हे पाहावे लागेल.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now