सध्या इलेक्ट्रिक बाईकचा अचानक स्फोट होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. आता एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या इलेक्ट्रिक बाईकचा त्याच्या बेडरूममध्येच स्फोट झाला आहे. ज्यामध्ये संबंधित इलेक्ट्रिक बाईकच्या मालकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी जखमी झाली आहे.
संबंधित घटना ही आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे घडली आहे. बाईक मालकाचे नाव के शिवकुमार असून ते 40 वर्षांचे होते. ते एक डीटीपी कार्यकर्ता होते. त्यांनी शुक्रवारी इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती. त्याच रात्री त्यांनी गाडीची बॅटरी बेडरूममध्ये चार्जिंगला लावली होती.
मात्र, शनिवारी पहाटे सगळे झोपेत असताना अचानक गाडीच्या बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली, त्यामुळे एसी आणि इतर काही वस्तू जळून खाक झाल्या. पोलिसांना घटनेची माहिती समजताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांना रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला.
तर या घटनेत त्याची पत्नी जखमी झाली. तिची प्रकृती नाजूक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेदरम्यान, या दाम्पत्याच्या मुलांचाही जीव गुदमरला. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू झाला आहे.
सध्या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट होण्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येतात. काही दिवसांपूर्वीच पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. 26 मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट झाला होता.
दिवसेंदिवस घडत जाणाऱ्या या गंभीर घटनेवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. त्यांनी नुकतेच ट्विट केले होते की, इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीच्या घटनांबाबत आता चौकशी केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबतचे निकष कंपन्यांकडून पाळले गेले नसेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई होईल.