नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला

काल संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी झाली. विवाहित महिला वडाची पूजा करतात, वडाला दोरा गुंडाळतात, आणि पुढचे सात जन्म हाच नवरा भेटो अशी प्रार्थना करतात. याच वटपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामधून तिने आपले वटपौर्णिमा विषयी विचार मांडले आहेत.

अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच काही वेगळे विचार शेअर करत असते. काल देखील वटपौर्णिमेनिमित्तानं तिने पोस्ट शेअर केली आहे. आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर तिनं साता जन्माच्या गोष्टी असं हेडिंग देत पोस्ट केली आहे. त्यात तिने वडाची पूजा करण्यावरून आपलं मत व्यक्त केलं आहे.

हेमांगीने लिहिले, नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्त्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा, आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलंही आयुष्य वाढेल कदाचित! काय?

त्यानंतर लिहिते, यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचारणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो! असे हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेमांगीच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हेमांगीचा विचार पटलेला आहे. तर काहींनी तिच्या विचारांना विरोध करत प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी आमच्या भावना दुखवल्याचे देखील सांगितले. तर काहींनी हेमांगीला प्रश्न विचारला की, तुम्ही किती झाडं लावलीत ते सांगा.

हेमांगी नेहमीच तिचे विचार सोशल मीडियावर पोस्ट किंवा व्हिडीओ शेअर करून मांडते. अनेक मुद्यांवर ती आपले विचार मांडते. तिच्या अनेक पोस्ट यापूर्वी देखील व्हायरल झाल्या आहेत. अनेकांना तिचं रोखठोक बोलणं पटतं तर अनेक लोक तिच्या पोस्टवर वाद घालताना पाहायला मिळतात.