तर दुसरीकडे वीज पुरवठ्या अभावी राज्यात शेतीचं मोठं नुकसान होत आहे. शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप ही तोडगा निघालेला नाहीये. अशातच एका पीडित शेतकऱ्यांना थेट विद्युत वितरणच्या अधीक्षक यांच्या समोर आपली व्यथा मांडली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून बीडच्या खांडे पारगाव, नागपूर खुर्द, अंतरवन पिंपरी यासह जवळपास 7 गावांमध्ये लाईट विस्कळीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देणं नाहीये. तर दुसरीकडे उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यात लाईट विस्कळीत असल्याने पीक जळून चालली आहेत.
अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड शहरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी “साहेब… पाया पडतो, लाईटची भीक मागतो, पीक जळतायत वीज द्या”, अशी मागणी करत लव्हाळे नामक शेतकऱ्याने टाहो फोडला आहे.
दरम्यान, बीडमधील हा व्हिडिओ समोर आला आहे. ‘साहेब, माझ्या खिशात पैसा नाही म्हणून साहेब तुम्हाला भीक मागतोय, केवळ आम्हाला लाईट द्या, बाकी काही नको. आमचं उभं पीकं जळतायत… असं या शेतकऱ्याने विद्युत वितरणच्या अधीक्षकांना म्हंटले आहे.
तसेच ‘आम्हाला का पिसाळलेलं कुत्र चावलंय का ? साहेब.. आम्ही इथं कशाला आलोत, आम्ही काय तुमचे दुश्मन नाहीत हो.. आम्ही कुणावर अन्याय केलाय का ? आम्ही काय बँक लुटलीये का ? साहेब…, असे सवाल या पीडित शेतकऱ्याने व्यक्त केले आहेत. दरम्यान, आता तरी लाईटीचा प्रश्न सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.