अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणातून क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता शाहरुख खान आणि त्याच्या कुटूंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता या एनसीबीच्या चार्जशीटमधून आर्यनबाबत एक नवीन बाब उघडकीस आली आहे.
गेल्या शुक्रवारी एनसीबीने न्यायालयात चार्जशीट सादर केली. यामध्ये आर्यन खानचे नाव नव्हते. त्यामुळे एवढ्या दिवस चाललेल्या प्रकरणातून आर्यनची मुक्तता झाली. मात्र, आता एनसीबीच्या चार्जशीटमधून नवीन बाब उघडकीस आली, ती म्हणजे, चौकशीदरम्यान आर्यनने गांजा ओढत असल्याचे कबूल केले होते.
आर्यनने चौकशीदरम्यान कबूल केले होते की, २०१८ साली यूएसमध्ये असताना तो गांजा ओढत होता. त्याला स्लीपिंग डिसऑर्डर म्हणजेच झोपेसंदर्भात समस्या होती, त्यामुळे तो गांजाच्या संपर्कात आला होता. त्यावेळी तो गांजा सेवन करत होता असे त्याने स्वतः सांगितले.
आर्यन खानने एनसीबीला दिलेल्या जबाबात हे मान्य केलं आहे की, त्याने २०१८ साली ग्रॅज्युएशनदरम्यान गांजा स्मोकिंग सुरू केले होते. तेव्हा तो यूएसमध्ये राहात होता. त्यावेळी त्याला झोपेचा त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर या स्लीपिंग डिसऑर्डरबद्दल वाचले होते की गांजा ओढल्याने झोपेचा त्रास दूर होतो, म्हणून तो गांजा ओढत होता.
आर्यनने सांगितलेली ही सगळी माहिती चार्जशीटमधून समोर आली आहे. दरम्यान, गेल्यावर्षी एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना ड्रग केसमध्ये ताब्यात घेतले होते. मात्र आर्यन खानविरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने एनसीबीने त्याला क्लिनचिट दिली आहे.
एनसीबीने म्हटले की, आर्यन खानविरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात चार्जशीट फाइल करण्यात आली नाही. तसेच आर्यनसह अन्य सहा जणांवर कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या प्रकरणात मात्र,१४ जणांवर आरोप सिद्ध झाला आहे आणि एनसीबीचा असा दावा आहे की त्यांच्याविरोधात पुरावे देखील मिळाले आहेत.