Share

बंजारा समाजाच्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; संजय राठोडांना पाडण्यासाठी बंजारा समाज एकवटला

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

बंजारा समाजाते नेते आणि शिंदे सरकारमध्ये अन्न व प्रशासन मंत्री असलेले संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे लवकरच पोहरादेवी येथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, आज बंजारा समाजाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना समर्थन देखील दिलं आहे. बंजारा समाजाचे नेते राजू नाईक यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली.

नाईक यांनी यावेळी समस्त बंजारा समाज आजही शिवसेनेसोबत आहे असे आश्वासन दिले. तसेच पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचा उद्धव ठाकरे यांना आग्रह केला. बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे धार्मिक स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून संजय राठोड यांची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्या बंडामध्ये संजय राठोड सहभागी झाले आहेत. संजय राठोड हे बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळे बंजारा समाज शिवसेनेसोबत होता.

त्या समाजाचा पाठिंबा शिवसेनेला कायम राहावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून शिवसेनेसोबत असलेल्या इतर बंजारा समाजातील नेत्यांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यामुळे आता संजय राठोड यांना येणाऱ्या दिवसात याचा फटका बसणार का पाहावे लागेल.

 

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now