समाजात तृतीयपंथीयांना अजूनही हिणपणाची वागणूक दिली जाते. समाजात अजूनही माणसात त्यांना गणले जात नाही. मात्र समाजातील हा भेदभाव दूर करण्यासाठी,आणि या कम्युनीटीला न्याय देण्यासाठी काही लोक पुढे सरसावले आहेत. तृतीयपंथीयाबरोबर लग्न करून एका युवकाने समाजापुढे एक वेगळा दृष्टिकोन ठेवला आहे.
बीडमध्ये एका तृतीयपंथीयाशी विवाह करण्यासाठी एक तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून सपना नामक किन्नर आणि युवक बाळू धुताडमल हे रेलेशनशीपमध्ये आहेत. आता त्यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख किन्नर सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं. तब्बल अडीच वर्ष लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहून त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या रूसव्या फुगव्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झाली आहे.
आजही समाजात या घटकाला स्वीकारण्यासाठी काही लोक नाकं मुरडताना दिसतात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर नक्कीच निर्माण झाला होता. मात्र चर्चेतून निर्णय घेऊन,नातेवाईकांचे मन परिवर्तन करत अखेर विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचे लग्न जुळवण्यासाठी बीडच्या पत्रकार संघाने देखील प्रयत्न केले.
असा विवाह होणारी समाजात अजून एक जोडी आहे. सध्या ती जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फॅन फॉलोव्हर्स आहेत. ती जोडी म्हणजे, मनमाड मधील किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांची होय. ते सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनात फार सुखी आहेत.
या विवाहानंतर आता किन्नर सपना आणि बाळू हे लग्न करणार आहेत. त्यांनी लग्न केल्यानंतर मराठवाड्यातील हा पहिला आगळा वेगळा विवाह म्हणून प्रसिद्ध होईल. अनेकांनी या समाजातील लोकांच्या भावना समजावून घेत त्यांच्या विवाहाला प्रोत्साहन दिलं आहे. सध्या समाजात हा बदल स्वीकारणं गरजेचं आहे.
.