बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. मात्र या मेळाव्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे हुबेहूब बाळासाहेब ठाकरेंचा वेश परिधान करून आलेल्या व्यक्तीने.
शिंदे गटाने आपला मेळावा हा ठाकरे गटाच्या मेळाव्यापेक्षा अधिक चांगला बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आपल्या मेळाव्याला ठाकरे गटाच्या मेळाव्यापेक्षा अधिक गर्दी व्हावी, मेळाव्याचे लोकांना अधिक आकर्षण वाटावे यासाठी शिंदे गटाने प्रचंड मेहनत घेतली आहे.
त्यातच आता शिंदे गटाच्या मेळाव्यात चक्क बाळासाहेब यांनी हजेरी लावली आहे. हुबेहूब बाळासाहेब ठाकरेंचा वेश करुन एक व्यक्ती मेळाव्यासाठी आल्यानं खास आकर्षण ठरले आहेत. विशेष म्हणजे या प्रती बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
हुबेहूब बाळासाहेब ठाकरेंचा वेश करुन आलेले इसम ७० वर्षांचे असून, त्यांचं नाव भगवान शेवडे आहे. शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या या प्रति बाळासाहेब ठाकरेंनी यावेळी प्रसार माध्यमांपुढे आपल्या भावनाही व्यक्त केल्या. ते बोलताना प्रचंड भावूक झाले.
त्यांनी प्रसार माध्यमांसमोर त्यांची एक आठवण शेअर केली. म्हणाले, काही काळापूर्वी एकनाथ शिंदे कामानिमित्त साताऱ्याला आले होते, त्यावेळी त्यांनी साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला भेट दिली होती. तेव्हा मी खुर्चीत बसलो होतो. पण मला उठता येईना आणि चालता येईना म्हणून मी खुर्चीतच बसून होतो, माझ्याकडे बघितल्यानंतर शिंदेंच्या डोळ्यात पाणी आले होते.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांना माझ्यात बाळासाहेब दिसत होते. असे भगवान शेवडे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान, लोकांनी या हुबेहूब दिसणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली.
भगवान शेवडे यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, शेवडे हे साताऱ्याचे रहिवासी असून अनेक वर्षांपासून शिवेसनेचे सदस्य आहेत. त्यांना साताऱ्यात प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखतात. तसेच शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.