शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना काल ईडीने अटक केली. त्यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. संजय राऊतांवरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काल संजय राऊत यांच्या मुंबईतील घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्या घराबाहेर त्यांना समर्थन देण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली. त्यानंतर फोर्टच्या ईडी कार्यालयाबाहेर देखील शिवसैनिकांनी गर्दी केली. ईडी-भाजपविरोधात शिवसैनिकांनी राज्यातल्या विविध शहरांत आंदोलन सुरु केलं आहे.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी देखील संजय राऊत यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं. त्यांनी त्यात राऊतांच्या जिगरबाजपणाचं आणि धीटपणाचं कौतुक केलं आहे.
दिघे यांनी ट्विट केलं की, ‘बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय! ना डर,ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवाची भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी..! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत?’
दरम्यान, पत्राचाळ जमीन प्रकरणाबाबत काल सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला. त्यानंतर संजय राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे गटावर हल्लाबोल केला.
https://twitter.com/KedarDighe1/status/1553710548365152256?t=p0qQlPLjY4lNllCi8tpYlg&s=19
संजय राऊत म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. हे सगळं दमनचक्र सुरु आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला फटकारलं.