Share

‘बाळासाहेबांनी मिठी मारली आणि म्हणाले…’ राज ठाकरेंनी सांगितला शेवटच्या भेटीचा प्रसंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. तसेच शिवसेना सोडताना झालेल्या घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाष्य केले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना घडलेल्या घडामोडींदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या भेटीबाबत भावूक आठवण सांगितली. राज ठाकरे म्हणाले, मी केले ते बंड नव्हते. मी सत्तेसाठी शिवसेनेतून बाहेर पडलो नव्हतो, मी बाहेर जाऊन वेगळा पक्ष काढला होता.

म्हणाले, हे सगळे मी बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केले होते. असं सांगताना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा आतापर्यंत न सांगितलेला प्रसंग सांगितला. यावेळी बाळासाहेबांनी घट्ट मारलेली मिठी आणि तो प्रसंग आज हजारोंच्या सभेत सांगताना राज ठाकरेंचा आवाज जरासा कातर झाला होता.

राज ठाकरे म्हणाले, मला आजही ती गोष्ट स्पष्ट आठवते, ज्यावेळी बाळासाहेबांना कळलं की हा राज काही पक्षात राहात नाही… मी बाळासाहेबांना भेटायला गेलो… माझी ती शेवटची भेट होती. मी आजपर्यंत ही गोष्ट कधी कुणाला बोललो नाही. पण मी निघताना बाळासाहेबांनी मला जवळ बोलावलं होतं.

त्यावेळी माझ्यासोबत मनोहर जोशी होते. मला जवळ बोलावल्यावर मनोहर जोशी खोलीच्या बाहेर गेले. त्यावेळी बाळासाहेबांनी मला जवळ बोलावून दोन्ही हात पसरुन घट्ट मिठी मारली… अन् म्हणाले जा आता हा प्रसंग सांगत असताना राज ठाकरे थोडे भावूक झाले.

म्हणाले, मी गद्दारी करुन, बंड करुन, खंजीर खुपसून शिवसेनेतून बाहेर पडलो नाही.. मी बाळासाहेबांना भेटून, त्यांना सांगून पक्षाबाहेर पडलो. आजपर्यंत जे बाहेर पडले, त्यांनी सत्तेत जाणं पसंत केलं. मी तुमच्या सगळ्यांचा भरोशावर नवा पक्ष काढला, ज्याची दिमाखात वाटचाल सुरु आहे, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now