सोशल मीडियावर २४ तारखेपासून बिहारच्या हाजीपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते ६ जणांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. ज्या सहा जणांना मारहाण करण्यात आली ते मुस्लिम तरुण असून ते साधूच्या वेशात भिक्षा मागत होते.
हाजीपूर येथील कदमघाट येथे हे लोक साधूच्या वेशात नंदी बैलासोबत थांबले होते. राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. चौकशीत साधूच्या वेशात आलेले लोक मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बजरंग दलाच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सहा मुस्लिम तरुण आणि सहा नंदीबैलांची सोडवणूक केली. तसंच त्यांच्याकडून पीआर बॉन्ड लिहून घेत त्यांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, राष्ट्रीय बजरंग दलाच्या लोकांनी पोलिसांसमोरही या मुस्लिम तरुणांना लाठीमार केला. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे मुस्लिम तरुणांनी सांगितले की ते हे काम वर्षानुवर्षे करत आहेत, त्यांचे पूर्वजही नंदीसोबत भिक्षा मागायचे, त्यांच्या परंपरेनुसार ते नंदीसोबत हिंडतात.
चौकशीदरम्यान पोलिसांना दोन जणांकडून आधार कार्ड मिळाले. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील रुपडीहा पोलीस स्टेशन परिसरातील मेहबूब अली, सुब्रती, मोहम्मद हसन, मोहम्मद करीम, सय्यद अली, हलील अहमद अशी त्यांची नावे आहेत.
साधू बनलेल्या मुस्लिम समाजातील लोकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व ६ मुस्लिम साधूंना पीआर बाँडवर सोडले असून ६ नंदी बैलांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे, तर राष्ट्रीय बजरंग दलाचा नेता आणि अज्ञात लोकांवर धार्मिक उन्माद पसरवल्याबद्दल आणि आयटी कायद्यान्वये स्थानिक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.