महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. सभेत राज ठाकरे यांनी ३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील, असा अल्टिमेटम दिला होता.(aurangabad mosque police)
त्यानंतर सोमवारी राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत मनसैनिकांना एक आदेश दिला होता. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. तसेच आता पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करु असेही राज ठाकरेंनी म्हटले होते.
अशात मंगळवारी राज ठाकरेंनी तीन पानांचे पत्र सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी देशातील तमाम हिंदू बांधवांना विनंती केली आहे की, ४ मे पासून जिथे जिथे भोंगे लागती तिथे तिथे भोंग्यावर हनुमान चालिसा लावावी. ज्यामुळे भोंग्यांचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजायला हवे.
त्यामुळे ४ तारखेला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या भागातील मशिदींमध्ये भोंग्याविनाच अजान पार पडली आहे. तसेच यावेळी तिथल्या परीसरात पोलिस बंदोबस्तही होता.
पोलिस मनसे कार्यकर्त्यांवरही कारवाई करताना दिसून येत आहे. पोलिसांनी कल्याणमधील २५ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच जे मनसे कार्यकर्ते शांततेचा भंग करतील अशा कार्यकर्त्यांवर पोलिस लगेच कारवाई करतील असेही पोलिसांनी सांगितले आहे.
औरंगाबादमध्येही कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांनी हा बंदोबस्त दिला आहे. औरंगाबादमध्ये ४८ मशिदींबाहेर पोलिस बंदोबस्त दिसून येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता पोलिस अधिकारी घेताना दिसून येत आहे.