मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांची अखेर सुटका झाली आहे.
राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवार (४ मे) रोजी जामीन मंजूर केला. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले . मागील १४दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
मात्र, तुरुंगातील वास्तव्यामुळे नवनीत राणा यांना अनेक शारीरिक व्याधी जाणवू लागल्या. त्यांना मानदुखीचा त्रास होऊ लागला.त्यामुळे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांच्यावर सध्या तेथे उपचार सुरु असून आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीत जाऊन नवनीत राणा या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राणा यांंनी यापूर्वी आपल्या वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला होता,की आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा दावा केला होता . या पत्राची दखल घेत या संदर्भातील अहवाल २४ तासांच्या आत सादर करण्याचा आदेश लोकसभा सचिवांनी दिला होता.
तसेच लोकसभा अध्यक्षांशिवाय राणा दाम्पत्य गृहमंत्री अमित शहा आणि गृहसचिवांची यांची भेट घेवून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा प्राप्त आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राणांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा :
दरम्यान, प्रथमदर्शनी राणा दाम्पत्यावरील हे राजद्रोहाचे कलमच चुकीचे असल्याचे मत मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले आहे.तसेच राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की,अशाप्रकारे एखाद्यावर थेट राजद्रोहाचा आरोप करणे चुकीचे आहे आणि या प्रकरणात १२४ अ कलम लागू होत नाही. तसेच पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस दिल्यानंतर त्यांनी आपले खार येथील निवासस्थान सोडले नव्हते आणि त्यांनी आपले आंदोलन देखील मागे घेतले होते. त्यानंतर अशा प्रकारे एखाद्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे असे मत नोंदवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
जेलवारी वाईटच, प्रचंड त्रास होतोच, आणि मानसिक खच्चीकरण…; रुपाली पाटलांची राणा दाम्पत्यावर खास पोस्ट
सायन रुग्णालयातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले, ज्या रुग्णालयात…
वडिलांवर लावलेल्या आरोपांनंतर संतापला शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा; म्हणाला, अशा फालतू गोष्टींवर…
धक्कादायक! मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने हत्या; वाचा नेमकं प्रकरण काय?