मुंबईच्या बीकेसी मैदानात काल शिवसेनेने जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेचे आयोजन महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवरून केंद्र आणि भाजप सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही सभा गेले काही दिवस सुरु असलेल्या मनसेच्या भोंग्याविरुद्धचे आंदोलन आणि भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी घेतली असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विविध मुद्यावरून भाजपला लक्ष केले.
महागाईवरून भाजपवर टीका करत असताना त्यांनी, अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेवर बैलगाडी नेऊन मोर्चा काढल्याची आठवण भाजपला करून दिली. पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेवर बैलगाडी नेऊन मोर्चा काढला होता.
उद्धव ठाकरे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेवर बैलगाडी नेऊन मोर्चा काढला होता, तो फक्त पेट्रोलच्या किंमतीत 7 पैसे दरवाढ झाली होती म्हणून. तेव्हाची भाजपा आज राहिली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंची ही भूमिका आजची नाही.
यापूर्वी देखील अटलबिहारी वाजपेयी यांच्या या मोर्चावरून भाजप सरकारला लक्ष्य करण्यात आलं होतं. मध्यंतरी विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपायी यांचा आधार घेतला होता. विरोधी पक्षांनी 48 वर्षांपूर्वीचा वाजपायी यांचा व्हिडिओ शेअर करत भाजपला लक्ष्य केले होते.
आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. पेट्रोलच्या किंमतींनी 120 रुपयांचा दर पार केला आहे. काही ठिकाणी 123 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल विकले जात आहे. डिझेलचीही याच दिशेने आगेकूच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर सभेत निशाणा साधला.