Share

..त्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्राने पंजाबकडे ७.५ कोटींची मागणी केली, भगवंत मान यांच्या आरोपाने खळबळ

पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे साडेसात कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे. पंजाब विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करताना ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मी आणि आम आदमी पार्टीचे नेते साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे गेलो आणि आम्ही सांगितले की, आपण हे पैसे आम्हाला मिळणाऱ्या संसद स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या (एमपीएलएडी) निधीतून कापून घ्या, त्या बदल्यात आम्हाला फक्त पंजाब भारताचा भाग नाही, आम्ही लष्कर भाड्याने घेत आहोत असे लिहून द्या.

भगवंत मान म्हणाले की पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या झाल्यानंतर लष्कर तिथे पोहोचले. त्याआधी सरकारचे एक पत्र आले त्यात लिहिले होते की, लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे, त्यामुळे आता यासाठी पंजाबला 7.5 कोटी रुपये केंद्राला द्यावे लागतील.

न्यूज एजन्सी एएनआयने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या भाषणाचा भाग देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यात ते दावा करत आहेत की पठाणकोट हल्ल्यानंतर केंद्राने पंजाबकडे लष्कर पाठवण्याच्या बदल्यात 7.5 कोटी रुपये मागितले होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. सुमारे 80 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

पठाणकोट हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. यादरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. पठाणकोट हल्ल्या दरम्यान केंद्राने पंजाबकडे सैन्यांच्या बदल्यात पैसे मागितले असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्याने आता यावर केंद्राचे काय उत्तर असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now