माणसाच्या जीवनात एक तरी असा मित्र असावा जो सुख दुःखात एकत्र असेल. अडचणीच्या वेळी मदत करेल. पण म्हणतात, अशा मित्रांचा सहवास लाभण्यासाठी भाग्य लागते. अभिनय क्षेत्रात असे दोन अभिनेते आहेत, ज्यांच्या मैत्रीतील अशा प्रकारचा गोडवा कोणाला माहिती नाही.
हे दोन अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अशोक सराफ आणि नाना पाटेकर आहेत. या दोघांनी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही. मात्र त्यांच्या मैत्रीची कहाणी ऐकल्यानंतर कोणालाच विश्वास बसणार नाही की हे दोघे एकमेकांच्या एवढ्या जवळ आहेत.
नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीचे किस्से अफलातून आहेत. एका मुलाखती दरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्यातील मैत्रीचा किस्सा प्रेक्षकांना सांगितला होता. म्हणाले, आम्ही एकत्र कोणत्या चित्रपटात काम केले नाही. मात्र ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकामुळे आम्ही मित्र बनलो आणि अधिक जवळ आलो.
या नाटकामुळे आमची मैत्री घट्ट झाली. याच नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेल्या घटनेने अशोक सराफ यांचा जीव धोक्यात आला होता. एका प्रयोगादरम्यान काही कारणामुळे प्रयोग रद्द करावा लागला. प्रेक्षकगृहात प्रेक्षक जमले होते. प्रयोग रद्द झाल्याचं समजताच प्रेक्षकांच्या रागाचा पारा चढला.
तेव्हा अशोक समोरच उभा असल्याने प्रेक्षक त्याच्या अंगावर धावून आले, असे नाना पाटेकर म्हणाले. अशावेळी नानांनी प्रसंगावधान दाखवत सराफ यांना प्रेक्षकगृहाच्या मागच्या बाजूने बाहेर काढलं. तिथे उभ्या असलेल्या सायकल रिक्षात बसवलं आणि तिथून धूम ठोकली. त्यावेळेस जर अशोक सराफ प्रेक्षकांच्या हाती लागले असते तर त्यांचं काही खरं नव्हतं.
त्यानंतर या घटनेची काहींना माहिती झाली. तेव्हा अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांची दोस्ती किती जिगरी आहे हे लोकांपुढे आले. नाना पाटेकर यांनी आणखी एका घटनेचा किस्सा सांगितला. म्हणाले, ‘हमीदाबाईची कोठी’ करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोकला २५० रुपये. त्याने मला पैशांची खूप मदत केली. आम्ही पत्ते खेळत असताना अशोक मुद्दाम हरायचा. जेणेकरून मला १०- २० रुपये मिळतील. तेव्हा मला पैशांची गरज होती म्हणून अशोकने माझी मदत केली असे नाना पाटेकर म्हणाले.