मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यापेक्षा सुंदर असतं असं म्हटलं जातं. जीवाला जीव लावणारा, अडचणीत मदतीचा हात देणारा मित्र भेटण्यासाठी नशीबच लागतं. त्यात मैत्री नेमकी कशी असावी याचं उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास, नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांचं देता येईल.
नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील घट्ट मैत्रीबद्दल आपण अनेकदा ऐकलं आहे. त्यात आता नाना पाटेकर यांनी आपला मित्र अशोक सराफसोबतचा एक भावनिक किस्सा सांगितला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत नाना पाटेकर यांनी एक किस्सा सांगितला आहे. म्हणाले, हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोकला २५०रुपये मिळायचे. त्या पडत्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली, असे नाना पाटेकर म्हणाले.
तसेच म्हणाले, नाटकाच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हारायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती. अगदी नाटकानंतर बऱ्याचदा मी डोकं चेपून द्यायचो, पाय चेपायचो आणि त्याचेही तो मला पैसे द्यायचा.
यावेळी नाना पाटेकर यांनी गणपतीची आठवण सांगताना एक किस्सा सांगितला. म्हणाले, एकदा गणपतीला माझ्याकड़े पैसे नव्हते. फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. तेव्हा सकाळी सहा साडे सहा वाजता अशोकने माझ्या घरी येऊन माझ्या हातात एक कोरा चेक दिला.
अशोक चेक देत म्हणाला, खात्यात १५ हजार आहेत, तुला हवे तेवढे काढ, आणि निघून गेला असे नाना पाटकेर म्हणाले. पुढे नाना म्हणाले, तेव्हा मी अशोकच्या खात्यातून तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षांनंतर जेव्हा आम्ही एका सिनेमात एकत्र काम केले तेव्हा मी त्याचे पैसे परत केले. अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्यातील घट्ट मैत्री अजूनही कायम आहे.