एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारनं आणलेल्या अनेक योजनांना स्थगिती देणं सुरू केलं.
मागील सरकारच्या अनेक प्रकल्पांना शिंदे फडणवीस सरकारकडून ब्रेक लागला आहे. मात्र, आता शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघातील वॉटर ग्रीड योजनेला शिंदे सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. भोकरमधील १८३ गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना शिंदे सरकारनं मंजूर केली आहे. ७२८ कोटी रुपयांची ही योजना असून त्यासाठीची निविदा १० दिवसांपूर्वीच काढण्यात आली आहे.
मागील सरकारनं आणलेल्या अनेक योजनांना ब्रेक दिला जात असताना शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर इतकं मेहरबान का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण पक्ष नेतृत्वावर नाराज असून ते काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू आहे.
त्यातच भाजप शिंदे सरकारने अशोक चव्हाण यांचा प्रकल्प मंजूर केला, त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहेत. अशोक चव्हाण यांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यामागे शिंदे फडणवीस सरकारचा कोणता हेतू असेल का, अशी चर्चा सध्या होत आहे.
दरम्यान, जेव्हा शिंदेंनी भाजपच्या साथीनं सत्ता स्थापन केली. तेव्हा सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत असताना काँग्रेसचे १० आमदार विधिमंडळात अनुपस्थित होते. या आमदारांमध्ये अशोक चव्हाणांचा समावेश होता.