Pratap Patil On Ashok Chavan: कालपर्यंत जनता तुमच्यावर फुलं उधळायची, आज तुम्हाला आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागतायत; प्रताप चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

Pratap Patil On Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी चव्हाण यांच्यावर कडक शब्दांत हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, “गेली पन्नास वर्षं नांदेडमधील जनता तुमच्यावर फुलं उधळत आली, पण आज तुम्हालाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर फुलं उधळावी लागतायत,” असा टोला त्यांनी लगावला.

नांदेडमधील पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar group) कडून रेशन वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना थेट लक्ष्य केलं. त्यांनी पुढे म्हटलं, “अशोक चव्हाण यांची आजची अवस्था पाहून वाईट वाटतं. जे लोक कधी तुमच्याकडे गर्दी करायचे, ते आज कुठं गेले आहेत हे तुम्हालाच विचारावं लागेल. कालपर्यंत जनतेनं तुमच्यावर फुलं उधळली, आणि आज तुम्हालाच आरएसएसच्या पथसंचलनात फुलं उधळावी लागत आहेत. हेच तुमच्या राजकारणाचं वास्तव आहे.”

त्यांनी पुढे मतदारांना उद्देशून आवाहन केलं, “आता अशोक चव्हाण पुन्हा मत मागायला येऊ शकणार नाहीत. त्यामुळे येथून पुढे सगळे मत राष्ट्रवादी काँग्रेसला द्या, जबाबदारी मी घेतो,” असा विश्वास चिखलीकरांनी व्यक्त केला.

दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये शस्त्रपूजन आणि पथसंचलनाचं आयोजन केलं जातं. यंदा नांदेडच्या शिवाजीनगर भागात झालेल्या या सोहळ्यात अशोक चव्हाण स्वत: उपस्थित राहिले होते आणि संघ स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली होती. यामुळे काँग्रेसच्या माजी नेत्याकडून असा सहभाग पाहून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) हे देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. गांधी घराण्याशी निष्ठा ठेवणारे अशोक चव्हाण अचानक भाजपमध्ये दाखल झाल्याने काँग्रेसमधून असंतोष व्यक्त झाला. त्यांच्या पक्षांतरानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर ‘विचारसरणी बदलल्याचा’ आरोप होत आहे.