सध्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता मुंबई महापालिकाच्या निवडणुकीबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी लोकमतशी बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. ज्यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
आशीष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला की, मुंबई महानगर पालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही सेवालाय सुरू करू असे तुम्ही म्हणत आहात, मग तुमच्या या सेवालयात यशवंत जाधव नेमके कोणत्या भूमिकेत असतील? यावर शेलार यांनी दिलेलं उत्तर राजकीय खळबळ निर्माण करणारं आहे.
आशीष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत सत्ता आली तर भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मिळून खऱ्या अर्थाने सेवालाय सुरू करू, मात्र या सेवालयाच्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस नसेल, असे आशीष शेलार म्हणाले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
यशवंत जाधव नेमके आहेत तरी कोण, तर शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात सहभाग घेतला. त्याआधी त्यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेने प्रवेश केला, आणि दोन दशकांमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.
यशवंत जाधव यांना त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा अध्यक्षपद देण्यात आले होते. २०१७ मध्ये यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपविले. २०१८ पासून ते सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षही होते.
दरम्यान, भाजपमधील काही नेत्यांनी यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केंद्रीय आयकर विभागाने देखील त्यांच्या घरावर धाड टाकून जवळपास ५३ मालमत्ता जप्त केल्या, यामध्ये अनेक हॉटेल, फ्लॅट, यांचा समावेश होता.