Share

Shivsena : उद्धव ठाकरेंचा ‘तो’ दावा खोटा म्हणणाऱ्या आशिष शेलारांना वाळुंज कुटुंबियांनी पाडलं तोंडावर ; काय आहे नेमकं प्रकरण?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका गटप्रमुखांच्या मेळाव्यात रमेश वाळुंज या शिवसैनिकाच्या कार्याबद्दल कौतूक केले होते. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडत, रमेश वाळुंज हे भाजपचे होते असे सांगितले. याबाबत आता वाळुंज कुटुंबियांनी खरी माहिती देत भाजपला तोंडावर पाडले आहे.

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये २१ सप्टेंबर रोजी झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात रमेश वाळुंज यांचा उल्लेख केला होता. ठाकरे म्हणाले होते की, रमेश वाळुंज यांनी समुद्रात वाहून जाणाऱ्या मुलींचा जीव वाचवला होता. मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

तसेच त्यांनी ती बुडणारी मुलगी हिंदू आहे की मुस्लीम आहे, मराठी आहे की अमराठी आहे हे न पाहता वाचवलं होतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेने रमेश वाळुंज यांच्या पत्नीला नोकरी देऊन आधार दिला असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

उद्धव ठाकरे यांनी रमेश वाळुंज यांच्याबद्दल केलेल्या या कौतूकावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून ठाकरेंचा दावा खोडून टाकला. ‘मुलींना वाचवणारे रमेश वाळुंज हे शिवसेनेचे नसून भाजपचे होते. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र चर्चा होती, त्यामुळे शिवसेनेने वाळुंज हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगून त्यावेळी मतं मागितली,’ असे आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांच्या या ट्विटला आता रमेश वाळुंज यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. वाळुंज कुटुंबियांनी आम्ही शिवसेनेत असून यापुढेही शिवसेनेत राहणार आहोत असे सांगितले. तसेच शिवसेना नेत्यांसोबत असणारे रमेश वाळुंज यांचे जुने फोटो देखील दाखवले.

रमेश वाळुंज यांच्या मृत्यूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सेना नेते अनिल परब त्यांच्या घरी गेले होते हे दाखवणारे ते फोटो होते. वाळुंज कुटुंबियांनी दिलेल्या या पुराव्यामुळे आता भाजप नेते आशिष शेलार चांगलेच तोंडावर पडले आहेत. वाळुंज यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शेलार यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना योग्यवेळी उत्तर देणार असे म्हंटले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now