अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला . हा मोर्चा नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने काढण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये काही महिलांनी आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच आसाराम बापू निर्दोष असून एका मुलीच्या सांगण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांचे अनुयायी करत आहेत. मोर्चादरम्यान आसाराम बापूंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हातामध्ये वेगवेगळे फलक होते.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती 16 वर्षांची होती.
आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती. त्यांची पुढे कोर्टात केस चालली.
त्यानंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम गुरू बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं. त्याला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर इतर दोघा आरोपींना 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र आता त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या मोर्चामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.