बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून क्लिनचिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून, विविध लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून आर्यन खानला क्लिनचिट मिळाल्यानंतर पत्रकारांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांना प्रश्न केला. यावर समीर वानखेडे म्हणाले, मी सध्या एनसीबीमध्ये कार्यरत नाही. ‘यावर मी काहीच टिप्पणी करू इच्छित नाही, मला माफ करा’ अशी प्रतिक्रिया दिली.
घडलेली घटना म्हणजे, एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीदरम्यान छापेमारी केली होती. गेल्या वर्षी 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती.
त्यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्याची कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर काल, शुक्रवारी एनसीबीने दोषारोपपत्र दाखल केले.
त्यात आर्यन खान याच्यासह सहा जणांना क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता एकीकडे आर्यन खानला दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी योग्य तपास न केल्याने समीर वानखेडेवर कठोर कारवाईचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.
सरकारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, गृह मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी समीर वानखेडेची चौकशी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता पुढे समीर वानखेडे यांच्याबाबत कोणता निर्णय होतो पाहाणे आवश्यक आहे.