वणी(Vani): नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.
देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली होती पण आता गेल्या ४५ दिवसांत श्री सप्तशृंगी देवी मूर्तीवरील तब्बल दोन हजार किलो शेंदूर काढण्यात आला. त्यासाठी कुठलीही रासायनिक प्रक्रिया करण्यात आली नाही. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज २१ जुलैपासून सुरू केले होते. श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे.
तेजस्वी , प्रफुल्लित, स्वयंभू मूळ मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी पार पडला. गुरुवारी भाविकांना या मूर्तीचे दर्शन झाल्याने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याचे दिसून आले. देवीचा साज अत्यंत देखणा केलेला असतो. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.
तीन दिवसाच्या सोहळ्यानंतर मंदिर एक दिवसासाठी ग्रामस्थ, भाविक यांच्यासाठी खुले करण्यात आले होते. काम सुरु असताना मूर्तीवर धुळ बसू नये म्हणून अन्य काम आठवडाभर बंद ठेवले गेले. शेंदूर कवच उतरविले जाताना मूर्तीचे स्वयंभू रूप पुढे येत गेले. मूर्तीच्या वरच्या भागासह खालील भागातील हत्ती व अन्य कोरीव शिल्पे नजरेत येताच त्यांची योग्य रीतीने डागडुजी करण्यात आली.
मूर्तीची प्रतिष्ठापना ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त तथा तहसीलदार बी. ए. कापसे, विश्वस्त ॲड. ललित निकम, डॉ. प्रशांत देवरे व भूषण तळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. सोमेश्वरानंद महाराज, विष्णुगिरी महाराज, शिवगिरी महाराज, दिनेशगिरी महाराज, गणेशपुरी महाराज, ऋषिकेश नंदगिरी महाराजांसह आमदार नितीन पवार उपस्थित होते.
त्याचबरोबर प्रा. देवयानी फरांदे, माजी आमदार संजय चव्हाण, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक महेश निकम, बबन पाटोळे, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीच्या सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वी होणार आहे. ज्योत, प्रसादालय, निवास, दवाखाना आदी सेवा सुरु राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Nashik: नाशिकमधील ७ लहान मुले गायब, खरी माहितीसमोर येताच पोलिसांसहीत सगळेच हादरले
चार दिवस अतिवृष्टी; राज्यात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज
Britain: राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कोहीनूर हिऱ्याचं काय होणार? कुणाला मिळणार जगातला सर्वात दुर्मिळ हिरा? वाचा…
शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे न जाता थेट भाजपचा रस्ता धरला; एकनाथ शिंदेंना का डावललं?