मध्यंतरी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. ६६ वर्षांच्या अरुण लाल यांनी ३८ वर्षांच्या बुलबुल साहा यांच्याशी लग्न केलं, त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा झाली होती. आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
अरुण लाल यांनी आता बंगाल क्रिकेट संघांच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझा हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. याला कोणत्याही वादाची पार्श्वभूमी नाही. प्रशिक्षण देणं हे आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास काम आहे.
तसेच म्हणाले, आम्हाला पूर्ण दिवस प्रवास करावा लागतो. क्रिकेटच्या संघाला प्रशिक्षण देणे अवघड काम असते. मला वाटते की मी म्हातारा होत आहे. यामुळे मी माघार घेत आहे. तसेच मी हा निर्णय आनंदाने घेत आहे. कोणतीही नाराजी नाही.
मी फक्त वयस्कर होत आहे. बंगालच्या संघाने आता चांगली प्रगती केली आहे. मुलं चांगली कामगिरी करत आहेत. मला आशा आहे की त्यांचे भविष्य उज्वल आहे. पुढची ३ ते ५ वर्षे बंगालची मुलं चांगली कामगिरी करतील. बंगालचा संघ येत्या काही वर्षात अव्वल स्थानावर असेल असे अरुण लाल म्हणाले.
दरम्यान, अरुण लाल यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या तरुणीसोबत लग्न केलं. ही ३८ वर्षीय तरुणी पेशाने शिक्षिका आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. ६६ वर्षीय अरुण लाल यांनी ३८ वर्षांच्या तरुणीसोबत दुसरं लग्न केल्याने सर्वांना आश्चर्य वाटलं.
अरुण लाल यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, अरूण लाल यांनी भारताकडून १६ कसोटी सामने खेळले असून त्यांनी ६ अर्धशतकांच्या जोरावर ७२९ धावा केल्या आहेत. तर १३ वनडे सामन्यात एक अर्धशतक ठोकत १२२ धावा केल्या. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६ सामन्यात १०,४२१ धावा केल्या आहेत. त्यात ३० शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.