मात्र, राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला चार दिवस शिल्लक आहे. मात्र अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम आहेत.
“पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा”, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात सुरु असलेल्या तणावाबाबत चिंता व्यक्त करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
याबाबत मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भोंग्याच्या प्रश्नावर ता. ३ मे रोजीची दिलेली मुदत बघता त्या दिवशी राज्यात अशांतता पसरविण्याचा कट असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच राज्यात शांतता रहावी यासाठी ता. १ मे रोजी सर्व जिल्ह्यात शांती मार्च काढण्यात येणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे. सरकारलाही शांतता पाहिजे दंगल होऊ नये अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं म्हणत आंबेडकरांनी राज्य सरकारची पाठराखण केली.
दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला परवानगी मिळू नये अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. मनसे, भाजपा आणि राज्य सरकारची भूमिका पाहता, ३ मेला राज्यात काहीही घडू शकतं, अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली. मनसेच्या माध्यमातून अशा धृवीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.