‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तत्पूर्वी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांसाठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तर त्यावेळी चित्रपट पाहून अनेक दिग्दर्शकांनी चित्रपट आणि नागराज मंजुळेंचे भरभरून कौतुक केले होते. या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपसुद्धा उपस्थित होते. तर अनुराग यांनीही ‘झुंड’ चित्रपट पाहून (Anurag kashyap About Jhund) नागराज मंजुळे यांना मिठी मारत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अनुराग कश्यप यांनी जेव्हा ‘झुंड’ चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी सिनेमागृहाबाहेर येताच नागराज मंजुळे यांना मिठी मारली. यावेळी चित्रपट पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘आतापर्यंत मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘झुंड’ हा सर्वाधिक चांगला चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून मला पुन्हा एखदा फिल्ममेकिंग शिकावसं वाटत आहे. हा एक अप्रतिम चित्रपट असून नागराज मंजुळे यांनी अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे’.
अनुराग यांनी पुढे म्हटले की, ‘ते केवळ चांगले दिग्दर्शकच नाहीत तर वेडे आणि निडरसुद्धा आहेत. हा चित्रपट कमाल असून चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे. कारण चित्रपटात अभिनय न येणारे इतके कलाकार असून त्यांच्याकडून असा अभिनय करून घेणे हे अप्रतिम आहे’.
या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी इतरही अनेक दिग्दर्शक उपस्थित होते. तर चित्रपट पाहून ओम राऊत यांनी म्हटले की, ‘प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे’. तर ‘झुंड’ हा मास्टरपीस असल्याचं मिलोप झावरी यांनी म्हटलं. दुसऱ्या एका दिग्दर्शकाने या चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले की, ‘भारताकडून हा चित्रपट ऑस्करला नामांकित झाला पाहिजे’.
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट नागपूरमधील निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहेत. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा हा पहिला वहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
प्रदर्शनापासूनच ‘झुंड’ या चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करत असून चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळताना दिसून येत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी २.१० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रूपयांची कमाई करत तीन दिवसात चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘तेव्हा लोक मला म्हणायचे की, तु हिरोईनसारखी दिसत नाहीस’; माधुरीने जुन्या आठवणींना दिला उजाळा
माधुरी दिक्षीतने सांगितला तिन्ही खानसोबत काम करण्याचा अनुभव, सांगितले प्रत्येकाचे वेगवेगळे गुण
लोकं संतापली! कपिल शर्मा शोवर बहिष्काराची मागणी; ‘हे’ आहे त्यामागचे कश्मीर कनेक्शन