सध्या अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. हा फक्त एक चित्रपट नसून सत्य घटनेवर आधारित कथा आहे. जी देशातील सर्वच लोकांच्या अगदी जवळ आहे. हा चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ हा होय. हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल तर करत आहेच. मात्र हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना आपले अश्रू अनावर होत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांनी माध्यमांशी खास बातचीत केली आहे. या मुलाखती दरम्यान अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
अनुपम खेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जेव्हा विवेकजींनी मला पहिल्यांदा ही कथा सांगितली, तेव्हा ही कथा ऐकणे माझ्यासाठी त्रासदायक होते. कारण मी स्वतः एक काश्मिरी पंडित आहे. माझ्या वडिलांचे नाव पुष्कर होते. म्हणूनच मी या चित्रपटात माझे नाव पुष्कर ठेवले आहे. मला प्रत्येक शॉटच्या आधी माझ्या वडिलांचा चेहरा आठवायचा. चित्रपटात रडण्यासाठी ग्लिसरीन लावावे लागते. पण या चित्रपटात माझे अश्रू खरे होते.”
अनुपम खेर पुढे म्हणाले की, “मी हा चित्रपट अभिनेता म्हणून केलेला नाही. त्यात मी काश्मिरींची आठवण करणारी व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाला प्रचंड यश मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे. माझ्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मी कोणत्याही चित्रपटासाठी लोकांमध्ये इतका उत्साह पाहिला नाही. मी या चित्रपटाला माझ्या कारकिर्दीतला आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानतो.”
तसेच या मुलाखतीत अनुपम खेर यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, “काही लोक हा चित्रपट प्रोपगंडा म्हणून सांगत आहेत. केरळ काँग्रेसने या घटनेला नरसंहार न म्हणता दहशतवादी हल्ला म्हटले होते. असे म्हंटले की, फक्त ४०० पंडित मारले गेले आणि १५ हजार मुस्लिम मारले गेले.”
यावर उत्तर देत ते म्हणाले की, “या जगात दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक फक्त गोष्टींवर विश्वास ठेवतात. मी त्या लोकांकडे लक्ष देत नाही. माझ्या आईने माझ्यासोबत २ वेळा चित्रपट पाहिला, ती स्वतः २ रात्री झोपू शकली नाही. कारण माझ्या मामासोबत अशीच एक त्रासदायक घटना घडली होती.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला असून ही आनंदाची बाब आहे. मी सर्वांचे आभार मानतो. काश्मिरी पंडितांचे पुनरागमन हा या चित्रपटातून एक मार्ग आहे. बदल हळूहळू होतो. ही तर फक्त सुरुवात आहे. प्रत्येक संध्याकाळनंतर एक सकाळ ही होतच असते. आणि त्याच सकाळच्या अगोदर ती रात्र आली आहे.”